सिंड्रेलाचा दु:श्वास..
सिंड्रेलाची गोष्ट तेजोमयीस फारशी आवडत नसे. त्यामुळे जेव्हा कधी बाबा, तिला, ही आमच्या घरची सिंड्रेला असं म्हणत, तेव्हा ती आपली नापसंती दर्शवाची. असं कधी झालं तर किमान अर्धा दिवस बाबांशी कट्टी ठरलेली..तेव्हा कुठून ही सिंड्रेलाची उपमा आठवली असं बाबांना व्हायचं.
सिंड्रेला सारखी सुंदर, छान, मनमिळावू, सर्वांची काळजी घेणारी, शांत असणारी आहेस म्हणून तुला सिंड्रेला म्हणतात गं बाबा, एकदा आईनं तिला समजावलं. मात्र तेजोमयीला आईच सांगणं काही पटलं नाही.
सिंड्रेलानं हीच काय घोडं मारलं हे कळत नाही बुवा..एकदा बाबा आईला म्हणाले.
जाऊ द्या हो, कुणाला काय आवडावं किंवा नाही आवडावं, याचं काही गणित नसतं आणि आपण काही जबरदस्ती करु शकत नाही..आई म्हणाली.
आईचं म्हणण खरच होतं..त्यामुळे पुढे काही दिवस किंवा काही महिने तेजोमयीच्या घरी सिंड्रेलाचा विषय निघाला नाही.
मात्र तीनचार महिन्यांनी आईने रद्दी विकायला काढली तेव्हा, तेजोमयीने सिंड्रेलाचं पुस्तक रद्दित विकण्याचा हट्ट धरला. हे मात्र अती होतय असं आईला वाटलं. तिला तेजोमयीचा रागही आला. पण, कुणाला काय आवडावं ,यावर आपण जबरदस्ती करु शकत नाही असं जे आईने बाबांना सांगितलं होतं, ते स्मरणात असल्याने आईने आपला राग गिळला. तिने सिंड्रेलाचे पुस्तक रद्दित जाऊ दिलं…
०००
त्या रात्री तेजोमयीच्या स्वप्नात, सिंड्रेला आली. तिला बघून तेजोमयीनं आपले डोळे घट्ट मिटून घेतले.
अगं, असं डोळे घट्ट मिटून घेतल्याने स्वप्नं थोडचं अदृष्य होतात. सिंड्रेला तेजोमयीस म्हणाली.
हो गं बाई, ठाउुकाय मला..तू काही मला शहाणपणा शिकवू नकोस..तेजोमयी रागाने म्हणाली.
अगं, तुझा माझ्यावरचा राग समजू शकते. पण तू माझ्यावरील पुस्तकाचा कां राग करतेस..सिंड्रेलाने विचारलं.
अच्छा तर,आईने माझी तक्रार केली वाटते तुझ्याकडे..तेजोमयी म्हणाली.
ती कशाला तक्रार करेल..उलट तिचा तर सिध्दांतच आहे ना, की कुणाला काय आवडावं, यावर काही बंधन घालू शकत नाही म्हणून..
मग झालं ना तुझं समाधान..जाकी आता दूर ..
अगं मी जाणारच..मी कशाला राहीन तुझ्या स्वप्नात..पण मला उत्सुकता आहे की,मी तुला आवडत कां नाही..तुझ्या बाबांना,माझ्यातले सगळे गुण तुझ्यात दिसतात..म्हणजे मी गुणी मुलगी नाही का..तरी सुध्दा मी तुला आवडत नाही..
अग तू गुणी असशीलही पण भीत्री आहेस..तुझा भित्रेपणा तुझ्या सगळया गुणांवर पाणी फिरवतो..तेजोमयी म्हणाली.
हे ऐकून सिंड्रेलाला धक्काच बसला. इतक्या वर्षात तिला कुणी असं काही बोललं नव्हतं.. तिचं कौतुकच कौतुक होत राहिलं होतं.. त्यामुळे तेजोमयीचे बोल कानावर पडताच तिच्या डोळयात अश्रू आले.ती हुंदका देत म्हणाली..
मी भित्री आहेस असं कां वाटतं तुला ..
कां नाही वाटणार? तुझी सावत्र आई, सावत्र बहिणी तुला डांबून ठेवतात. तुझ्यावर अन्याय करतात तरी तू आपली शांतच. विरोध नाही की व्रिदोह नाही..
आँ..
जेव्हा परीराणी, राजकुमाराच्या घरी तुला आणखी सुंदर बणवून पाठवते तेव्हा सुध्दा तू तिला तुझ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबात सांगत नाहीस..
आँ..
राजमहालात जातेस. परिने दिलेल्या वेळेत तू राजकुमारासोबत खेळतेस नाचतेस, तेव्हाही तुला त्याच्यासमोर तुझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडावी वाटत नाही..
आँ…
राजवाड्यातून घरी परततेस तेव्हा पायातले बूट राजवाड्यात विसरुन येतेस.हे बूट घेऊन राजकुमार बूट घालणाऱ्या मुलीच्या शोधात निघतो.तुझ्या घरापर्यंत पोहचतो तेव्हा तुझी सावत्र आई तुझ्या बहिणींना त्याच्या समोर पाठवते,मात्र तुला समोर येऊ देत नाही,तू तेव्हाही गप्पच बसते..
आँ..
अगं सिंड्रेला, मुलींनी इतकं भित्र राहिलं तर त्यांच्याकडे कुणी चांगल्या नजरेनं बघणार नाही. तुझ्या सारखी सोशिकता ठेऊन वागायचं म्हणजे,सतत मनात कुढत राहायचं, कुणीतरी आपल्या सुटकेसाठी येईल याकडे डोळे लावून बघायचं? मला नाही आवडत असा भित्रेपणा..मला कुणी माझ्यावर अन्याय केला, कुणी वाईट बोललं तर अजिबात खपत नाही..मी त्याला तोंड देते… कुणीतरी राजकुमार येईल,आपली सुटका करेल. मग लग्न करेल असं अजिबात नक्कोय.. मी माझी समर्थ होणारेय.. कळतय का तुला…
आँ…सिंड्रेला डोळे विस्फारुन म्हणाली.. तिच्या डोळयातून घळघळ अश्रू वाहू लागले. या अश्रूंमध्ये तेजोमयीचं स्वप्नही धुसर होत गेलं..
सुरेश वांदिले