(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

हत्तीशी मैत्री

कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तर तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं…

कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त काही थाऱ्यावर दिसत नाही. कसला विचार करतोस इतका.

कावळोबाने बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा आई त्याला रागावून म्हणाली..

कावळोबा तू मला सांगितलं नाही तर तुला आज जेवायलाच मिळणार नाही. जेवणाचं नाव आईच्या तोंडातून बाहेर पडल्यावर कावळोबांना भुकेची जाणीव झाली. सकाळपासून त्याने काहीही खाल्लं नव्हतं. त्यामुळे आईचे बोल कानावर पडताच पोटात कावळे ओरडायला लागल्याची त्याला जाणीव झाली. कावळोबाने लगबगीने डोळे उघडले आणि तो आई जवळ जाऊन बसला..

काय झालं माझ्या राज्या..सांगना मला..मी तुझी मदत करु शकेन की..आई कावळोबास म्हणाली.

अगं आई, तसं काही खास कारण नाही पण..कावळोबा म्हणाला.

पण काय..

मला सकाळपासून सारखं वाटतय की आपण हत्तीशी मैत्री करावी.

तुझ्या स्वप्नात हत्ती आला होता की काय..

नाही गं आई….तसं काही झालं नाही..मला उघड्या डोळयांनीच हत्तीशी मैत्री करावी असं वाटू लागलय..

मग अडचण काय त्यामध्ये..हत्तीकडे जा नि त्याला म्हण मला तुझ्याशी मैत्री करायचीय म्हणून..

इतकं सोप्प आहे का ते..

मला ठाऊक नाही राज्या..कारण आपल्या कावळे कुटुंबातील कुणी हत्तीशी मैत्री केलेली मला आठवत नाही. तसं कुणाला वाटलं सुध्दा नाही.

मला तसं वाटलं ते चूक कां गं आई..

ते मी कसं सांगणार बाळं..जोपर्यंत तुझी हत्तीशी मैत्री होणार नाही तोपर्यंत काहीच कळणार नाहीना…

मी हत्तीकडे गेलो आणि त्याला म्हंटलं माझ्याशी मैत्री कर..हे ऐकून त्याने मला हाकलून दिले तर..

पण, हे त्याच्याकडे गेल्याशिवाय कसं कळणार…

त्याच्याकडे जाणार कसं आई..

अरे उडत जाना..तुझ्याकडे पंख आहेत ते विसरलास की काय?

पण हत्ती कुठे राहतो हेच मला ठाऊक नाही ना गं..

मग आधी त्याचा शोध घे की..

तो कसा घेणार….

अरे, तुझ्या सर्व पक्षी मित्रांना सांग की..त्यापैकी कुणी तर आकाशातून उडत असताना हत्तीला नक्कीच बघितलं असणार ..

पण मला या पक्षांनी हत्तीचा पत्ताच सांगितला नाही तर..

नाही तर मग हत्तीशी मैत्री करण्याचा विचार सोडून दे..ते तर अगदीच सोप्प आहे..

नाही नाही…असं नाही करायचं मला..मला हत्तीशी मैत्री करायचीच आहे आई..

अरे बाळा..त्यासाठी तुला काहीतरी हालचाल करावी लागेल..त्याची काही तुझी तयारी दिसत नाही…तुला फक्त प्रश्नच पडताहेत. त्या प्रश्नांची उत्तरही शोधता यायला नको का..

होय आई…कावळोबा हिरमुसला होऊन म्हणाला. पण लगेच तो आनंदी झाला आणि आईला म्हणाला….आई मला उत्तर मिळालय..

अरे वा शाबास..मलासुध्दा सांग की…आई म्हणाली. तिने कावळोबाचं कौतुक केलं..

हत्तीलाच माझ्याशी मैत्री करण्याची सद्बुध्दी दे आणि त्याला माझ्याकडे धाड अशी मी देवाकडे प्रार्थनाच करतो ना..कावळोबा उत्साहानं म्हणाला..

यावर हसावं, रडावं की कावळोबास रागावावं हे आईला न कळल्याने आईने डोळे मिटून घेतले..

आई काहीच बोलत नाही हे बघून कावळोबास आपलं उत्तर बरोबर असल्याची खात्री पटली. त्यानेही डोळे मिटून घेतले. हत्ती त्याच्याकडे स्वत:हून मैत्रीसाठी आल्याचं स्वप्न कावळोबास दिवसाढवळया पडलं….

सुरेश वांदिले