हरवलेला विठ्ठल!
तेजोमयी फार चौकस होती. कुठेही गेलं की तिचं सूक्ष्म निरीक्षण सुरू असायचं. विशेषतः ऐतिहासिक परिसरात गेल्यावर तर विचारूच नका. तिच्या जिज्ञासेला गरुडाचे पंखच लाभत. हे पंख तिला इतरांना न दिसणाऱ्या गोष्टींकडे घेऊन जात.
ही काही दिवसांपूर्वीची गोष्ट. ती आईबाबांसमवेत हम्पीला गेली होती. हम्पी ही कर्नाटक राज्यातील विजयनगर साम्राज्याची राजधानी. या साम्राज्याची स्थापना चौदाव्या शतकात झाली. सोळाव्या शतकात कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरच्या बाजारपेठांतून सोन्याचा धूर निघत असल्याचं सांगितलं जातं.
हम्पी बघण्यासाठी बाबांनी एक गाईड केला होता. एकेक वास्तू बघत असताना गाईड एका ठिकाणी थांबला. तिथे पडक्या अवस्थेतील मंडपासारख्या दुकानांची दालनं होती.
“इथे कृष्णदेवरायाच्या काळात सोने-हिरे-चांदीची बाजारपेठ होती. जगातील अनेक प्रदेशांतून व्यापारी इथे येत असत.” गाईडने माहिती दिली.
“आपणही बघू या की ही बाजारपेठ.” तेजोमयी उत्साहाने म्हणाली.
“आता तिथे बघण्यासारखं काही उरलेलं नाही.” गाईड म्हणाला.
“तरीसुद्धा एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे?” तेजोमयीने हट्ट धरला. तिच्या आग्रहापोटी सगळे त्या अवशेषांकडे निघाले. गाईडही नाईलाजाने सोबत आला.
परिसरात प्रवेश करताच तेजोमयीने स्मार्टवॉचमधला कंपास लावून दिशा बघितली. ही दुकानं ईशान्य दिशेला होती. दगड-विटांच्या खचातून वाट काढत मंडळी पुढे जाऊ लागली. गाईड दोन-तीनदा परत फिरण्याविषयी बोलला, पण तेजोमयीने नकार दिला. शेवटी नाईलाजाने एका जागी बसून त्याने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. मात्र, त्याची नजर वारंवार त्यांच्याकडेच वळत होती.
पुढे एक मोठं दालन लागलं. त्याच्या खाली आणखी एक दालन असावं असं वाटत होतं. या दुसऱ्या दालनात जायला ओबडधोबड पायऱ्या दिसत होत्या. तिघेही त्या पायऱ्यांवर पाऊल टाकणार, तोच गाईड जोरात ओरडत धावत आला.
“थांबा! तिकडे जाऊ नका!”
“का, काय झालं?” तेजोमयीने विचारलं.
“डेंजर आहे.” तो म्हणाला. त्याच्या आवाजाला कंप सुटला होता.
“इथे तर काहीच डेंजर दिसत नाही.” बाबा म्हणाले.
“मी सांगतोय ना. माझं ऐका. पुढे जाऊ नका.” भिंतीतल्या एका फटीकडे बघून तो बोलत असल्याचं तेजोमयीने हेरलं.
“हा त्या फटीकडे टक लावून का बघतोय?” असा विचार तिच्या मनात आला.
“गाईडकाका म्हणतात तर कशाला आपण आगीची परीक्षा घ्यायची.” आईने काळजी व्यक्त केली.
“आई, आपण परीक्षा द्यायला चाललो आहोत असं समज.” तेजोमयीने हसून डोळे मिचकावले. हा विनोद काही आईला आवडला नाही.
“तुम्ही जा आत, मी थांबते वरच.” आई नाराजी व्यक्त करत म्हणाली.
गाईडने पुन्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तेजोमयी आणि बाबा खालच्या दालनात गेले. सूर्यप्रकाश खोलवर येत असल्याने समोरचं स्पष्ट दिसत होतं. काही अंतर चालून गेल्यावर एक भिंत लागली. त्यामुळे पुढे जाणं शक्य नव्हतं. तेजोमयी आणि बाबा मागे वळले, तोच तेजोमयीचं लक्ष त्या भिंतीच्या एका फटीकडे गेलं. त्यातून काहीतरी बाहेर पडल्यासारखं दिसत होतं. वरच्या दालनातील अशाच एका फटीकडे गाईडची नजर गेल्याचं तिला आठवलं.
तिने त्या फटीत हात घातला. तिच्या हातावर काहीतरी वळवळल्याने तिने झटदिशी हात बाहेर काढला. एक विंचू तिच्या हातावर वळवळत होता. ते बघून तेजोमयी घाबरलीच. बाबांनी झटक्यात त्या विंचवाला बाजूला ढकललं. नाहीतर तिला त्याने डंख मारलाच असता.
“आणखी काही संकट येण्याआधी चल आता इथून.” बाबा तिला रागावले. तेजोमयीचा नाईलाज झाला. मात्र तिने जेव्हा त्या फटीतून हात बाहेर काढला तेव्हा तिच्या हातात एक जीर्णशीर्ण झालेला मलमली कापडाचा तुकडा आला होता. विंचवाचं वळवळणं सुरू असतानाही तिने तो तुकडा घट्ट पकडून ठेवला होता.
दोघेही वर आले. तेजोमयी जरा घाबरलेलीच होती. बाबांचा चेहराही त्रासिक झाला होता.
“काय झालं?” आईने विचारलं. तेव्हा बाबांनी काय घडलं ते सांगितलं.
“याच डेंजरविषयी मी सांगत होतो.” गाईड खोल आवाजात म्हणाला. ही बाजारपेठ बघता बघता संध्याकाळ झाल्याने सगळी मंडळी हॉटेलकडे परतली.
०००
रात्री जेवण आटपून सगळे झोपायला गेले. पण तेजोमयीला झोप येईना. बाबांच्या नकळत बॅगपॅकमध्ये टाकलेला तो कापड तिला सारखा खुणावत होता. मोबाईलच्या प्रकाशात आणि भिंगाच्या साहाय्याने तिने तो निरखला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की, त्या कापडावर चित्रविचित्र आकृत्या आणि काही चिन्ह आहेत. ही तेव्हाच्या काळातील लिपीतर नसेल ना? तेजोमयीला वाटलं. हरप्पा-मोहेंजदरोच्या धड्यांचा अभ्यास करताना तिला अशा लिपींची माहिती मिळाली होती.
भिंगामुळे, त्या कापडावरील फिकट रेषाही आता स्पष्ट दिसू लागल्या. काही रेषा एकमेकींना काटकोनात छेदत होत्या. काही वळण घेत पुढे गेल्या होत्या. एका कोपऱ्यात कमळासारखे दिसणारे एक चिन्ह होते. तिने मोबाईलने त्या कापडाचा फोटो काढला. चित्र मोठे करून पाहिले. बहुतेक सर्व रेषा ठरावीक दिशांनाच वळत होत्या. तिने लगेच स्मार्टवॉचमधील कंपास सुरू केला. कापड टेबलावर ठेवून तिने त्याची दिशा जुळवली. कापडावरील रेषा ईशान्य दिशेकडेच जात होत्या. बाजारातील दालनही ईशान्येलाच होते. हा योगायोग? की संकेत? तेजोमयीच्या मनात प्रश्नावर प्रश्न येऊ लागले.
आवाज न करता तिने कापड परत बॅगपॅकमध्ये ठेवलं आणि झोपायचा प्रयत्न केला. पण डोळ्यासमोर ती लिपी, चिन्हं आणि रेषा पुन्हा पुन्हा तरळत राहिल्या. त्या रेषांमधून एक आकार उमटल्याचा भास तिला झाला. बघता बघता त्या आकाराने एका मूर्तीचं रूप घेतलं. कमरेवर हात ठेवलेली ती मूर्ती होती.
“बापरे!” तेजोमयी जोरात ओरडून उठली. तिच्या ओरडण्याने आईबाबा जागे झाले. त्यांनी काय झालं विचारलं. तेजोमयीने सारा घटनाक्रम सांगितला.
“म्हणूनच गाईड, डेंजर डेंजरची रट लावत होता वाटतं.” तेजोमयीला जवळ घेत आई म्हणाली.
“पण डेंजर विंचवाचं होतं की आणखी कशाचं?” तेजोमयीला या प्रश्नाने घेरलं. याविषयी उद्या गाईडला थेट विचारायचं असं मनोमन ठरवून ती झोपी गेली.
०००
दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळे विजय विठ्ठल मंदिराकडे गेले. वाटेत तेजोमयीने गाईडला विचारलं, “काका, काल तुम्ही त्या दालनातील फटीकडे टक लावून काय बघत होतात? तुम्हाला त्या दालनाबद्दल आणखी काही माहीत आहे का?”
“त्या ठिकाणच्या पडक्या भिंतींमधून विंचू-साप निघतात, म्हणून पर्यटकांना मी नेहमी अडवतो. रात्री तिथे सावल्यांचा खेळ चालत असल्याचं आमच्या काही लोकांनी बघितलंय. म्हणून मी सावध केलं इतकंच.” गाईडने चाचरत उत्तर दिलं.
०००
सगळेजण मंदिराच्या गाभाऱ्यात गेले. सध्या या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती नाही, फक्त चबुतरा आहे. ही विठ्ठलाची मूर्ती तिथून गायब झाली, पळवून नेली की नष्ट केली, याचा काहीच पत्ता लागलेला नाही.
तेजोमयी चौकस नजरेने गर्भगृहाचं निरीक्षण करत असतानाच स्मार्टवॉचमधील कंपासने या मंदिराची दिशाही ईशान्येलाच असल्याचा संदेश दिला.
मंदिर बघून झाल्यावर मंडळी हॉटेलवर पोहोचली. खोलीत गेल्यावर तेजोमयीने कालचं आणि आजचं तिचं निरीक्षण आईबाबांना सांगितलं. ते ऐकून दोघेही थक्क झाले.
तेजोमयीने आपल्या बॅगपॅकमधून काल मिळालेलं कापड बाबांना दिलं. लाईटच्या प्रकाशात हे कापड ते काळजीपूर्वक बघू लागले. तेजोमयी म्हणाली तसं त्यांनाही अगम्य अशी लिपी दिसली.
“मग बाबा, तुम्हाला काय वाटतं?”
“कशाबद्दल?”
“विठ्ठलमूर्तीच्या गायब होण्याचा आणि या कापडावरील लिपीचा काही संबंध असू शकेल का?” तेजोमयीने विचारलं.
बाबांना त्याक्षणी लक्षात आलं की दिल्लीतील, “भारत ज्ञानम” या संस्थेत त्यांचा एक लिपितज्ज्ञ मित्र संशोधक म्हणून काम करतोय. या भारत ज्ञानममध्ये आपल्या देशातील अतिप्राचीन लिप्या, पोथ्या, शिलालेखांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने संशोधन सुरू आहे. हे लक्षात येताच त्यांनी त्या कापडाला स्कॅन करुन त्या मित्राला मेल केला. त्याच्याशी बोलूनही घेतलं. तेजोमयीला काय वाटतं हेही त्यांना सांगितलं.
०००
संपूर्ण हम्पी बघून दोन दिवसांनी मंडळी घरी परतली.
०००
तिसऱ्या दिवशी लिपितज्ज्ञ मित्राचा व्हिडिओ कॉल आला.
“कापडावरील लिपीतल्या अक्षरांचा नमुना एआयने ओळखलाय. हा तेराव्या-चौदाव्या शतकातल्या स्थानिक लिपीशी मिळताजुळता आहे. एआयने डीप लर्निंग वापरून अनेक शक्यता तपासल्या. त्या कापडावर तेराव्या-चौदाव्या शतकातील शाईसारख्या रंगाने काढलेल्या एका अस्पष्ट चित्राचं बहुवर्णीय प्रतिमा तंत्र वापरून एआयने अभ्यास केला. त्यातून त्याला हे चित्र मंदिरातून गायब झालेल्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर्णनाशी जुळत असल्याचं लक्षात आलं. एआयने तीन शक्यता वर्तवल्या. एक- १५६५ च्या तालिकोटा युद्धानंतर उत्तरेकडील सुलतानांनी लूट करताना विठ्ठलाची मूर्ती नेली असावी; दोन – कृष्णदेवरायाच्या ओडिशा मोहिमेच्या काळात ईशान्य दिशेने मूर्तीचा प्रवास झाला असावा; तीन – स्थानिकांनी मूर्ती सुरक्षित ठिकाणी लपवली असावी. या तिन्ही शक्यतांमध्ये ईशान्य दिशा समान होती.
“याचा अर्थ मूर्ती त्या दालनात लपवलेली असू शकते का?” तेजोमयीने विचारलं.
“ती शक्यता एआयने वर्तवली आहे. पण आता ती मूर्ती तिथून हलवली गेली की तशीच राहिली, हे गुपित अजून उलगडलेलं नाही. ‘एआय’ने हम्पीच्या ईशान्येकडील परिसरात आणखी उत्खननाची शिफारस केलीय.” मित्र म्हणाला.
०००
काही दिवसांनी पुरातत्त्व खात्याकडून तेजोमयीच्या नावे एक पत्र आलं. तेजोमयीच्या निरीक्षणाची दखल घेत हम्पीच्या त्या भागात औपचारिक उत्खनन सुरू करण्याचा निर्णय झाला असून, तिच्या नावाची शिफारस पंतप्रधानांच्या विशेष बालपुरस्काराकरिता करण्यात आल्याचं त्यात नमूद होतं.
“विठ्ठलच पावला म्हणायचा!” आई हसून म्हणाली.
तेजोमयीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. मात्र त्याचवेळी तिच्या मनात एका प्रश्नाने पुन्हा उसळी घेतली, गाईडकाका खरंच फक्त विंचवाला घाबरत होते, की त्यांना त्या भिंतीपलीकडे काय आहे याची कल्पना होती?
जेव्हा कधी उत्खनन सुरू होईल, तेव्हाच याचं खरं उत्तर मिळणार होतं……..