हुडी आणि ती
ही परवाची गोष्ट. तेजोमयी आणि आई एका मोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. तेजोमयीसाठी हुडीचा शोध आई घेत होती. सगळीकडे फिरुन झाल्यावरही मनासारखी हुडी आईस दिसली नाही. त्यामुळे अखेरीस आईने मॉलमधील एकाजणास आपल्याला हव्या असलेल्या हुडीची माहिती कोणी देऊ शकेल का, असं विचारलं. तेव्हा त्याने एका मुलीस आईकडे पाठवलं.
आल्या आल्या त्या मुलीने, तिच्या गळयातील कार्डाकडे आईचं लक्ष वेधलं. मात्र आईने त्या कार्डाकडे बघितलच नाही.
आईने त्या मुलीस, कशी हुडी पाहिजे हे विचारलं. तेव्हा तिने हातवारे करुन सांगण्याचा प्रयत्न केला.
अगं, तू बोलत कां नाहीस, असं आईने तिला नाराजीनं विचारलं. तेव्हा तेजोमयीनं आईचं लक्ष त्या मुलीच्या गळयातील कार्डाकडे वेधलं. त्यावर लिहिलं होतं, मला बोलता येत नाही.
ती मुलगी बोलू शकत नसली तरी हातवारे करुन सारं काही व्यवस्थित सांगत होती. तेजोमयीला ते कळत होतं. आईला सुध्दा ते कळलं असावं. कारण तिने जेव्हा आणखी विचारलं तेव्हा त्या मुलीने त्याचंही उत्तर हातवारे करुन दिलं. तेही फार अवघड नसल्याचं तेजोमयीस वाटलं. पण, आईने आपली नाराजी तेजोमयीजवळ व्यक्त केली. एखादी बोलणारी मुलगी पाठवली असती तर बरं नसत कां झालं, असं आई तेजोमयीस म्हणाली.
आईचं हे बोलणं ऐकून तेजोमयीस धक्काच बसला. ती मुलगी मुकी असली तरी ती तिचं काम उत्तम रितीनं करत होती. तिच्याविषयी असं बोलणं तेजोमयीस अजिबात आवडलं नाही. तिने आईजवळ नाराजी व्यक्त केली.
आपणास हुडी नकोय,असं तिने सांगून टाकलं.
अगं पण…आई तिला समजावत म्हणाली.
पण नाही नि बीन नाही….तेजोमयी म्हणाली आणि मॉलच्या बाहेर पडली.
हा तुझा आगावूपणा झाला… तिच्या मागून आलेली आई तिला म्हणाली.
आगावूपणा असेलही, तुझं काय..त्या मुलीविषयी असं बोलणं बरोबर नाही ना आई..तिच्या जागी मी असते तर..
काहीतरी अभद्र बोलू नकोस….आई रागावून म्हणाली.
अभद्रच काय, काहीच बोलत नाही मी, तुझ्याशी….तेजामयी तिच्याकडे न बघताच म्हणाली.
घरी आल्यावर तेजोमयी खरोखरच आईशी एकही शब्द बोलली नाही. उपाशीच झोपून गेली.
ऑफिसमधून आल्यानंतर जेवण्याच्या वेळेस आईने, बाबांकडे तिच्या मते असलेला, तेजोमयीचा आगावूपणा सांगितला. बाबांनी आईची बाजू न घेता, तिचीच चूक असल्याचं समजावून सांगितलं. ती मुकी मुलगी स्वत:च्या या अंपगत्वाचा बाऊ न करता, काम करते, स्वत:च्या पायावर उभी राहते, याचं कौतुक करायचं सोडून तिच्या वैगुण्यावर बोट ठेवणं, योग्य नसल्याचं बाबांनी सांगितलं. आईला ते पटलं असावं. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आईने तेजोमयीस जवळ घेऊन सॉरी म्हंटलं.
आई, तुला खरोखरच वाईट वाटलं असेल ना तर, मॉलमधील त्या मुलीची क्षमा माग, तेजोमयी आईस म्हणाली. तिची नाराजी अद्यापही गेली नव्हती.
आईला स्वत:ची चूक मान्य झाल्याने ती लगेच, मॉल मधील मुलीची क्षमा मागायलाय तयार झाली. हे बघून आधी तेजोमयीस किंचित धक्का बसला. मग तिला आनंद झाला. तिची कळी खुलली.
त्या दोघी दुपारी, पुन्हा त्याच मॉलमध्ये गेल्या. गेल्या गेल्या आईने त्या मुलीला गाठून तिला सॉरी म्हंटलं. मुलीच्या चेहऱ्यावर हसू आलं.आईने आपणास कोणती हुडी हवीय हे तिलाच विचारलं. त्या मुलीने हातवारे करुन ती हुडी आईस दाखवली. आईने एकच्या ऐवजी दोन हुडी घेतल्या.
दुसरी कुणासाठी गं..तेजोमयीने आईस विचारलं. पण आई काहीच बोलली नाही. बिल देऊन झाल्यावर त्या मुलीकडे जाऊन तिला एक हुडी दिली.
तुझ्याशी खूप वाईट वागले. मला क्षमा कर..असं तिचे हात आपल्या हातात घेऊन आई म्हणाली. आईस तेव्हा हुंदका आला.ते बघून तेजोमयीच्या डोळयात अश्रू आले. ती मुलगीही गहिवरुन गेली. मॉलमधून निघताना त्या मुलीने आईच्या पायावर डोके ठेऊन तिचा आशीर्वाद घेतला. आपल्या आईचं हे रुप बघून तेजोमयीस आंनद झाला आणि आईचा अभिमानही वाटला.
मॉलच्या बाहेर पडताच तेजोमयीने आईला घट्ट मिठी मारली…
सुरेश वांदिले