“ज्यांना ह्यु-एन-त्संग ठाउकाय, त्यांनी हात वर करा?” अलेक्सा गोर्जी म्हणाली. तेजोमयीसह, सर्वच मैत्रिणींनी हात वर केला. गोर्जीने कपाळावर हात मारला.
“काय झालं?” तेजोमयीनं विचारलं.
“मला वाटलं, कुणालाच ह्यु-एन-त्संग ठाऊक नसणार.” गोर्जी म्हणाली.
“ही ही ही!” कल्याणी, कल्पिता आणि मीनाक्षीने गोर्जीला वेडावलं.
“कैसे बनाया?” वैष्णवीही त्यांच्या सामील झाली.
“म्हणजे, तुम्हाला तो माहीत नाही.” गोर्जीने आश्चर्य व्यक्त केलं.
“तोच काय, पण फ्यूफ, ज्यूफ, क्यूफ-एन-त्संग सुध्दा आम्हास ठाऊक नाही. हे हे हे!” तेजोमयीने गोर्जीची खिल्ली उडवली.
“अगं, तो इतिहासात तर होता.”
“होता किंवा असेल पण आत्ता कुठाय? हे हे हे!”
“मग, तुम्हाला तो दाखवू का?” गोर्जी म्हणाली. सगळ्याजणी दचकल्या. खरंच ह्यु-एन-त्संग, आला नाहीना इथे, म्हणून अवतीभवती बघितलं. पण तिथे त्या आणि गोर्जीशिवाय कुणीच नव्हतं. सर्वांना हायसं वाटलं. वैष्णविने गोर्जीवर डोळे वटारले,
“गोर्जेटले, तुझं बंडलबूंडल पुराण, बस्स झालं.”
“ह्यु-एन-त्संग आलाय असं कुठं म्हंटलय, मी फक्त म्हणाले दाखवू का?” गोर्जीने डोळे मिचकावले. यावर वैष्णवी काहीतरी तिखट बोलणार तोच तेजोमयी म्हणाली.
“मग तू, दाखव की त्याला.”
“पण, त्यासाठी एक खेळ खेळावा लागेल.” गोर्जी म्हणाली. खेळाचं नाव कानावर पडताच मुलींचे चेहरे उजळले.
“सांग सांग, कोणता खेळ? तुझे सारे खेळ फनडू असतात.” कल्याणी उत्साहात म्हणाली.
मीनाक्षी, कल्याणी, वैष्णवी, तेजोमयी, कल्पिता यांच्या हातात गोर्जीने, कोरे कागद ठेवले. त्यावर काहितरी लिहिलं होतं.
“पुढे काय?” प्रत्येकीचा प्रश्न.
कागदाचं काय करायचं, हे गोर्जीने समजावलं. ते ऐकल्यावर मुलींचा उत्साह आणखीच वाढला. गोर्जीने सांगितल्यानुसार संध्याकाळी मुलींनी सोसायटीच्या अवतीभवती, एक किलोमीटरपर्यंत चारही दिशांनी फेरी मारली. संध्याकाळी सात वाजता त्या घरी परतल्या.
लगेच तेजोमयी म्हणाली, “आता दाखव की, ह्यु-एन-त्संग!”
“धीर धरा, काही क्षणातच तो तुमच्यासमोर हजर होईल. पण, त्यासाठी तुम्हाला आणखी एक खेळ खेळावा लागेल.”
“खेळात दडलाय का हा ह्यु-एन-त्संग?”
“ते कळेलच, पण मी काय सांगते ते आधी करा.” गोर्जी म्हणाली. काय करायचं, हे तिने समजावलं. सोसायटीच्या एक किलोमीटर परिसरात काय दिसलं, याच्या नोंदी करायला तिने सांगितल्या होत्या. आता त्याचं वर्गिकरण करायचं होतं. त्यासाठी गोर्जीने कागदं तयारच ठेवली होती. प्रत्येकावर तिने सोसायटीच्या परिसरात काय असू शकतं, याची नावं लिहिली होती. त्याप्रमाणे मुलींनी त्यावर लिहून दिलं. प्रत्येक कागदावरील या यादीनुसार, गोर्जीने त्यांची बेरीज केली. त्याप्रमाणे सोसायटीच्या एक किलोमीटर परिसरात, फरसान दुकान ९, पाणीपुरी, भेळ, वडापाव, रगडा पॅटीस, मोमो, पिज्जा, आईसक्रीम दुकान ११, किराणा दुकान ४, रेस्टॉरेंट-३,कॉफी शॉप ३, फ्रुट शॉप ३, मेडिकल स्टोर्स ८, दातांचे दवाखाने ६, उद्याने ७, शाळा ६, मॉल ४, रस्त्यावरील शिंपी ३, गणपतीचे मंदीर ३, ओंकारेश्वर, सृष्टेश्वर, कल्याणेश्वर अशी वेगवेगळी नावे असणारी महादेवाची मंदिरे ५, पंचमुखी मारोती मंदीर १, पद्मावती-बालाजी मंदिर १, पान शॉप ४, योग वर्ग २, जिम ३, होमिओपथी दवाखाना १, पेट शॉप ३, आणि इतरही गोष्टी असल्याचं दिसून आलं.
“बापरे, इतक्या गोष्टी. आम्हाला तर ठाऊकच नव्हत्या.” कल्याणीने आश्चर्य व्यक्त केलं.
“पण, यात अजून ह्यु-एन-त्संग दिसत नाहीय?” तेजोमयीने गाडी पुन्हा त्याच रस्त्यावर आणली.
“दिसायला कशाला हवा, तुम्हीच आहात की सर्वजणी ह्यु-एन-त्संग!”
“गोर्जे, याला म्हणता खोदा पहाड आणि निघाला काकरोच!” वैष्णवीने वैताग व्यक्त केला.
“छे छे, ह्यु-एन-त्संग हा चिनी प्रवासी सातशेआठशे वर्षापूर्वी मजल दरमजल करत भारतात आला. तुम्ही जशा नोंदी केल्या तशा, तेव्हाच्या काळानुसार त्याने नोंदी केल्या. त्यामुळे तेव्हा कुठे, काय होतं, हे त्याच्या लक्षात आलं. आज तुम्हीसुध्दा सोसायटीच्याच परिसरात मजल दरजल करताच तुम्हालाही नव्या गोष्टी दिसल्या. हे शक्य झालं कारण तुम्ही ह्यु-एन-त्संग झालात म्हणूनचना.”
“आँ!”
“खरंच की.”
“पण…”
“आता काय?”तेजोमयीनं विचारलं.
“ह्युन-एन-त्संगला त्याकाळी आपल्याकडे अनेक ठिकाणी ग्रंथालयं दिसली. पण, आपल्या परिसरात एकही पुस्तकाचं दुकान तुम्हाला नाही दिसलं.” गोर्जीनं मुलींच्या लक्षात आणलं.
“हो गं.खरंच?”मुलींनी आश्चर्य व्यक्त केलं.
“याला म्हणतात काळाचा महिमा. ते जाऊ द्या, पण तुम्हा सर्वांना कसा वाटला आजचा खेळ?”
“ह्यु-एन-त्संग मु…” पुढचं बोलता बोलता वैष्णवी थबकली. इतर मुलींनी ह्यु-एन-त्संग जिंदाबादचा नारा दिला. गोर्जीच्या चेह-यावर हसू उमललं.
0000