तेजोमयीला कंटाळा आल्याने तिने अलेक्सा गोर्जीला गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला. गोर्जीकडे तर काय, गोष्टींची गुहाच होती. तिने आपल्या मेंदूला मनातल्या मनात काहीतरी सूचना दिल्या. लगेच तिचा मेंदू वायफायने स्मार्ट टीव्हीला जोडला. तेजोमयी टीव्हीसमोर सरसावून बसली. तेजोमयीची ही कृती म्हणजे आता गोष्ट दिसणार, हे अलेक्झांडरला चांगलं ठाऊक असल्याने तोही पाय पसरून, टीव्हीकडे बघू लागला.
पडद्यावर एक गुहा दिसू लागली. गुहेसमोर अलिबाबा उभा होता. त्याने “खुल जा सिम सिम” हा मंत्र म्हणताच गुहेचं गुप्त दार उघडलं. दार उघडताच प्रखर प्रकाशाने भरून गेलेल्या त्या गुहेने अलिबाबाचे डोळे दिपले. त्याने गुहेच्या आत पाऊल टाकलं. गुहेमध्ये हिरे, माणके, पाचू, सोने, चांदी, मोती आणि इतर मौल्यवान धातूंची रेलचेल होती. या धातूंमधून निघणाऱ्या प्रकाशाने गुहा उजळून गेली होती.
गुहेतील एकेक दालन पडद्यावर येत असतानाच त्या दालनाला एक वेगळं रूप मिळू लागलं. बघता बघता त्या गुहेचं रूपांतर एका स्मार्टफोनमध्ये झालं. पडद्यावर पुन्हा गुहा आली. त्यावर लिहिलं होतं – ही अलिबाबाची गुहा. ते चित्र जाऊन स्मार्ट मोबाईलचं चित्र आलं. त्याखाली लिहिलं होतं – ही आजच्या स्मार्ट मुलांची गुहा.
“अगं, हे काय?” तेजोमयीने आश्चर्यानं विचारलं. अलेक्झांडरच्या चेहऱ्यावरही तसेच भाव निर्माण झाले.
“तुला मोबाईलपण ओळखता येत नाही का?” गोर्जी हसून म्हणाली.
“गोर्जे, शहाणपणा करू नकोस. अलिबाबाची गुहा कशी काय मोबाईलमध्ये रूपांतरित झाली?” तेजोमयी रागावून म्हणाली. शेपूट आणि मान हलवून अलेक्झांडरने तिला पाठिंबा दिला.
“मी कुठे शहाणपणा केला? अलिबाबाच्या काळातील ओबडधोबड गुहा आजच्या काळात स्मार्ट होऊ शकत नाही का?”
“गोर्जे, गुहा स्मार्टच काय, कूल, उबर कूल किंवा सुपर कूलही होऊ शकते; पण मोबाईल कशी काय होऊ शकते?”
“तुला काय वाटतं रे, अलेक्झू?” गोर्जीने अलेक्झांडरच्या डोळ्यांत डोळे घालत विचारलं.
या अनपेक्षित प्रश्नाने स्वारी दचकली. “तुमचं तुम्ही बघा,” असे भाव चेहऱ्यावर आणत त्याने डोळे मिटले; पण कान आणखी टवकारून दोघींचं बोलणं तो ऐकू लागला. गोर्जीला हसू आलं. तेजोमयीनं आपलं हसू कसंबसं दाबलं.
“अगं, हसून घे. हसण्यामुळे तुझा स्मार्टनेस काही कमी होणार नाही,” गोर्जी डोळे मिचकावत म्हणाली.
“गोर्जे, आगावूपणा फार झाला हं. गोष्ट दाखवायची नसेल तर दाखवू नकोस; पण असं मध्येच गुहेचं रूपांतर मोबाईलमध्ये होतं, असं काहीबाही दाखवू नकोस.”
“अगं, ट्रान्सफॉर्मर सिनेमात नाही का, माणसाचा रोबो होतो, रोबोची मोटारसायकल होते, मोटारसायकलची उडती तबकडी होते! तसंच गुहेचं रूपांतर मोबाईलमध्ये का होऊ शकत नाही? तसं झालं म्हणून तुला आनंदच व्हायला हवा?”
“मला कशाला आनंद होईल?”
“कारण तुझ्या हातात अलिबाबाची गुहा आलीय ना!”
“तुझं आपलं काहीतरीच.”
“अजिबात नाही.”
“मग?”
“आता मला सांग, अलिबाबाच्या त्या गुहेत काय काय बघितलंस?”
“अमाप संपत्तीनं भरलेली दालनं.”
“म्हणजे धनशक्तीना?”
“हो.”
“मोबाईलरूपी गुहेतसुद्धा ॲप्सरूपी अनेक दालनं असतात.”
असं सांगत असतानाच गोर्जीने टीव्हीच्या पडद्यावरील मोबाईलमधील एक गेमचं ॲप उघडलं. त्यातील खेळ सुरू झाला. तेजोमयी लगेच त्यात रंगून गेली.
“अरे वा! हा गेम तर मस्तच!” ती उत्साहाने म्हणाली.
एक-दोनदा गोर्जीने तिला हलवलं.
“तेजो… बस झालं आता. बराच वेळ तू गेम खेळत आहेस.”
पण तेजोमयी गेममधून काही बाहेर येईना.
तेव्हा गोर्जीने तिला पुन्हा हलवलं. तेजोमयीच्या गालावर हलकीशी चापट मारत ती म्हणाली,
“तेजो, तुझा वेळ चोरणाऱ्या या गेमरूपी दालनात जास्त काळ अडकू नकोस.”
या गेमकडे अलेक्झांडरही टक लावून बघत होता. त्यालाही त्यात मजा वाटू लागली. तेजोमयी आपलं ऐकत नाही, हे लक्षात आल्यावर गोर्जीने ते गेमिंग ॲप बंद केलं आणि तेजोमयीला आरडाओरड करण्याची संधी न देता लगेच दुसरं ॲप सुरू केलं.
ते होतं समुद्राच्या तळाशी असलेल्या जीवसृष्टीची माहिती देणारं. रंगीबेरंगी मासे, विचित्र आकाराचे प्राणी, चमकणाऱ्या जेलीफिश पाहून तेजोमयी हरखून गेली.
“वा! समुद्राच्या तळाशी इतकं अद्भुत जग असतं?” ती आश्चर्याने म्हणाली.
गोर्जीने आणखी एक ॲप उघडलं. ते होतं भाषणकला शिकवणारं. त्यात आत्मविश्वासाने भाषण कसं करायचं याच्या टिप्स एक सर देत होते.
“या टिप्सचा उपयोग केलास तर तूही छान भाषण देऊ शकशील, तेजो,” गोर्जी म्हणाली.
अशी बरीच ॲप्स तेजोमयीला दाखवत असताना गोर्जीने अचानक, काहीबाही दाखवणाऱ्या रिल्स उघडल्या. एका रिलमध्ये मांजर नाचत होतं. एक माकड मोठ्या बसवर दगड फेकत होतं. दुसऱ्या रिलमध्ये एक मुलगा विचित्र हावभाव करून हसवायचा प्रयत्न करत होता. तिसऱ्या रिलमध्ये कोणीतरी साबण खाण्याचा अभिनय करत होतं.
या रिल्स बघून तेजोमयी हसू आलं.
“अरे वा! हे तर फारच मजेशीर!”
गोर्जीने लगेच या रिल्स बंद केल्या.
“अगं, पण…” तेजोमयीने तिला थांबवायचा प्रयत्न केला. अलेक्झांडरनेही कुंईई करत स्क्रीनच्या दिशेन पंजा उगारला. त्यालाही त्या रिल्स पाहायचे होते. गोर्जी हसली.
“बघ, जशी तू या बिनकामाच्या रिल्समध्ये अडकलीस, तसंच अलेक्झूही त्या दालनात अडकणार होता!”
“अगं, ते भारीच होतं ना…”
“तेजो, अशा रिल्स तू कितीही वेळ बघू शकतेस. अलिबाबाच्या गुहेत जशी खूप संपत्ती होती, तसेच तिथे चोरही दडून बसले होते.”
“त्याचा नि मोबाईलचा काय संबंध?”
“काही ॲप्स खूप छान असतात; पण काही ॲप्स आपला बहुमूल्य वेळ चोरतात. ते आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून त्यांच्यापासून जपून राहावं लागतं.”
“खरंच, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं,” तेजोमयी म्हणाली.
“आता कळलयना? मोबाईलरूपी गुहेतील ॲप्सरूपी दालनं अनेक प्रकारची माहिती देतात, आपली कामं झटपट करतात, काही ॲप्समधून नवं-नवं ज्ञान शिकता येतं. ही झाली ज्ञानशक्ती!”
“खरंच की!”
“ज्याच्याकडे अशी ज्ञानशक्ती असते, त्याच्यावर धनशक्तीही म्हणजे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते.”
“गोर्जे, असं जर आहे तर मग सगळे जण मोबाईल वाईट आहे, वाईट आहे असं का कोकलताहेत? आपल्या देशात कोणत्यातरी राज्यात म्हणे मुलांच्या मोबाइल बघण्यावरच बंदी आणलीय. मोबाइलमुळे म्हणे मुलांचं असं होतं नि तसं होतं असं बोललं जातं. थोडक्यात काय, मोबाइलमुळे मुलं वाया जातात असाच सुर ऐकायला येतो. त्यांना नाही का दिसत ही मोबाइल मधील अलिबाबाची गुहा?”तेजोमयी नाक फुगवून म्हणाली.
“बये बये, जरा शांत हो. आपला दोष दुसऱ्यावर ढकलण्याची तुम्हा मानवांची खास पद्धत आहे. गरज नसताना आई-बाबाच मुलांना मोबाईल देतात; पण त्यातलं चांगलं काय नि वाईट काय हे समजावून सांगायला त्यांना वेळ मिळत नाही. मग मुलं हाती लागेल ते बघत बसतात.” गोर्जी म्हणाली.
“तुला तर सगळंच ठाऊक आहे. मग कशाला मोबाईलला अलिबाबाची गुहा म्हणतेस?”
“तेजो, कारण मोबाईलरूपी गुहेला उघडणारा पासवर्डरूपी ‘खुल जा सिम सिम’ हा मंत्र तुमच्या हाती आहेना. चांगल्या दालनात शिरलात तर तुमचं भलं, वाईट दालनात शिरलात तर थेट खड्यात!”
“हं, पटतंय तुझं म्हणणं मला…”
“चांगलं की वाईट हे समजण्याइतके तुम्ही मुलं नक्कीच स्मार्ट आहात. बरोबर ना अलेक्झू?” गोर्जी हलकेच त्याचे कान उपटत म्हणाली.
अलेक्झांडर ताडकन उभा राहिला. उडी मारून नि शेपटी हलवत गोर्जीचं म्हणणं बरोबर असल्याचं त्याच्या पद्धतीने सांगून टाकलं.
त्याचवेळी टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा अलिबाबाची गुहा दिसू लागली. हिरे माणकांची दालनं एकापाठोपाठएक बंद होऊ लागली. हळूहळू ती गुहा पूर्णपणे अंधारात बुडून गेली. गुहेचं दार बंद व्हायला लागलं.
“थांबा थांबा, मला या गुहेत जायचय!” तेजोमयी स्वत:शीच पुटपुटली. तिच्या नकळत तिने उजवा हात पुढे केला. पण लगेच तिने तो हात मागे घेतला.
तिच्या नजरेसमोर एकामागून एक दृश्य झळकू लागले…गेमरुपी डाकुंनी तिचा चोरलेला वेळ, बिनकामाच्या रिल्समध्ये गेलेले तास,
आणि दुसरीकडे…
समुद्राचं अद्भुत जग,
भाषण शिकवणारे सर…
या विचारातच तेजोयमी असताना टीव्हीवरच्या गुहेचं दार पूर्ण बंद झालं. खोलीत क्षणभर पूर्ण शांतता पसरली. मोबाईल उचलत हळूच म्हणाली.
“खुल जा सिम सिम…”
“पण माझा सल्ला लक्षात आहेना तुझ्या, तेजो.” गोर्जीने विचारलं.
“बयो,ते कसं विसरेन? मोबाईलरुपी गुहेतलं कोणतं दार उघडायचं हे कळलय की मला.”
गोर्जीने टाळी वाजवून तेजोमयीला मिठी मारली. अलेक्झांडरनेही लगेच तिला मिठी मारुन तिच्या गालावरुन पंजा फिरवून तेजोमयीस शाबासकी दिली. गुहेत अंधार झाला असला तरी खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने खोली उजळून निघाली.
सुरेश वांदिले